जर्मन कादंबरी : द रीडर

 

जर्मन कादंबरी : द रीडर                                        

 

लेखकपरिचय                                                                                         

बेर्नहार्ड श्लिंक (Bernhard Schlink) चा जन्म १९४४ मध्ये एका लहान जर्मन गावात झाला. म्हणजे दुसरं महायुद्ध संपण्याच्या सुमारास. त्यानं कायद्याचा अभ्यास आणि संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि नंतर पोस्ट डॉक्टरेट डिग्रीही मिळवली. तो पब्लिक प्रोसेक्यूटर होता. स्वत:च्या अनुभवावर आधारित अनेक कथा कादंबऱ्या त्याने लिहिल्या, तसंच विधी विषयक पुस्तकेही लिहिली. घटना, स्वातंत्र्य, स्वदेश, ‘यूटोपिया’ असे अनेक विषय त्याने आपल्या लिखाणात हाताळले. “द रीडर” (Vorleser) ही त्याची १९९५ साली प्रसिद्ध झालेली कादंबरी विशेष गाजली. ती इंग्रजीत १९९७ साली प्रसिद्ध झाली आणि नंतर एकूण ४५ भाषांमध्ये भाषांतरित झाली. तिच्यावर २००८ मध्ये ह्याच नावाचा सिनेमाही निघाला. ह्या सिनेमाला अकादमी अवॉर्डची ५ नॉमिनेशन्स मिळाली आणि मुख्य भूमिकेसाठी केट विन्सलेटला अवॉर्ड मिळालं.

x.x.x

 

जर्मन कादंबरी : द रीडर

‘द रीडर’ ह्या कादंबरीत मुख्य पात्र आहे मायकेल. त्याच्या आयुष्यात आलेल्या हाना नावाच्या बाईंची ही गोष्ट आहे. ती तीन टप्प्यात सांगितली आहे. मायकेल चौदा-पंधरा वर्षांचा त्याची तिच्याशी भेट होते. हा पहिला टप्पा. नंतर तो २०-२२ वर्षांचा असताना हानाची कोर्टामध्ये केस होते आणि तिला जन्मठेप होते, हा दुसरा टप्पा आणि ती गेल्यानंतर मायकेल तिने सोपवलेलं काम पूर्ण करतो, हा तिसरा टप्पा.  

सारांश

मायकेल शाळेतून चालत घरी येत असतांना त्याला कळमळून येतं आणि रस्त्यात उलटी होते. रस्त्यावरच्या एका जुन्या इमारतीतल्या बाई त्याला आत घेऊन जातात, अंगणातल्या नळावर त्याचं तोंड धुतात आणि त्याला घरापर्यंत सोबत करतात. तेव्हा तो असतो साधारण चौदा-पंधरा वर्षांचा. त्याला कवीळ झाली आहे असं निष्पन्न होतं आणि बरेच दिवस त्याला शाळा बुडवून घरी राहायला लागतं. तो जरा बारा झाल्यावर त्याची आई त्याला सांगते, त्या मदत करणाऱ्या बाईंना भेटून धन्यवाद दे. तो फुलं घेऊन त्या बाईंकडे जातो. आणि नंतर ह्या ३० -३५ वर्षांच्या बाईंशी त्याचे घनिष्ट शारिर आणि प्रेम संबंध जुळतात. त्यांचं नावं असतं हाना श्मित्स (Hanna Scmitz).

तो काय शिकतो ह्याबद्दल हानाला उत्सुकता असते. तो सांगतो की जर्मनच्या तासांना ते साहित्याचा अभ्यास करतात. मग हाना त्याला प्रसिध्द लेखकांचं साहित्य मोठ्यांनी वाचून दाखवायला सांगते. ती ट्रॅम कंडक्टर म्हणून काम करत असते. तिच्या बदलत्या शिफ्ट प्रमाणे वेळा बदलून मायकेल तिच्या घरी जायचा. तिच्या आग्रहामुळे प्रथम तो तिला मोठ्यांदी पुस्तक वाचून दाखवायचा. पुढे काही दिवसानंतर टबमध्ये अंघोळ करणं, मग  प्रेम करणं आणि त्यानंतर थोडावेळ पडून गप्पा मारणं, हा एक प्रकारे त्यांच्या भेटीचा हा नित्यक्रम होता. हे असं जवळ जवळ वर्षभर चाललं होतं. आणि एक दिवस अचानक हाना नाहीशी होते. तो तिला खूप शोधतो, पण ती काही त्याला सापडत नाही. 

तो तिला सहा-सात वर्षानंतर अनपेक्षितपणे परत बघतो, ते कोर्टामध्ये आरोपी म्हणून. त्यावेळी मायकेल साधारण २०-२१ वर्षांचा असतो आणि विधी महाविद्यालयातला विद्यार्थी म्हणून ह्या केसचं निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी इतर काही विद्यार्थ्यांबरोबर कोर्टात हजार असतो. ही नाझींच्या काळातली केस असते, म्हणून तिचं जास्त महत्व असतं. कोर्टामध्ये त्यांची नजरा नजर होते. दोघंही एकमेकांना ओळखतात, पण त्यांचा प्रत्यक्ष संपर्क किंवा बोलाचाली होत नाही. हानाला जन्मठेपेची शिक्षा होते.

मायकेल त्याचं शिक्षण पूर्ण करतो. त्यानंतर तो लग्न करतो. पण काही वर्षातच डिव्होर्स होतो. त्याला एक लहान मुलगी असते. ती होस्टेलमध्ये असते. मायकेल मैत्रिणींशी जवळीक करायचा तेव्हा नेहेमीच हानाचं सावट त्याच्यावर असतं. तो वकील म्हणून कोर्टाचे दावे न घेता विधीइतिहासाच्या अभ्यासाचं आणि संशोधनाचं काम स्वीकारतो. कित्येक वेळा तो रात्री स्वस्थ झोपू शकत नसे. रात्री जाग आल्यावर तो वाचायला सुरवात करायचा. मोठ्यांदी वाचायचा. साहजिक त्याला हानाची आठवण व्हायची. हाना कुठल्या तुरुंगात आहे ह्याची माहिती तो कोर्टातून काढतो. मग तो पुस्तकच्या पुस्तकं वाचून, हानाला कॅसेट पाठवायला लागतो. अशी काही वर्षं गेल्यावर एकदा त्याला हानाचं दोन ओळींचं पत्र मिळतं. त्यात हानाने त्याला धन्यवाद दिलेले असतात. नंतर एखाद्या पुस्तकाबद्दल किंवा निसर्गासंबंधी दोन चार वाक्य असलेल्या चिठ्ठ्या ती लिहीत राहते. तो कशाचंही उत्तर देत नाही. १८ वर्ष शिक्षा भोगल्यानंतर तिला सोडून देण्याचा निर्णय होतो. तेव्हा जेलर बाई मायकेलला पत्र लिहितात. ती सुटण्याच्या आदल्या दिवशी तो तिला तुररुंगात भेटायला जातो. वेळ संपल्यावर निघतांना तो सांगतो, ‘मी उद्या सकाळी तुला घ्यायला येतो.’ पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो तिथे जाण्यापूर्वीच हाना आपल्या खोलीत स्वतः ला टांगून घेऊन आत्महत्या करते.

हानाची कोर्ट केस

हानाच्या कोर्ट केसमध्ये ती धरून एकूण पाच जर्मन बायका आरोपी असतात. पोलंड मधल्या क्रकाऊ ह्या गावाजवळच्या एका छळछावणीत युद्ध काळात ह्या बायका सुपरवाईजर असतात. आणि ज्यू स्त्री कैद्यांवर नजर ठेवणं हे त्याचं काम असतं. ह्या छळछावणीतून दर आठवड्याला जवळपास साठ कैद्यांना आऊसश्वित्झच्या भयंकर छळछावणीत पाठवलं जायचं आणि तेवढेच कैदी परत क्राकाऊला यायचे. क्रकाऊमध्ये त्यांच्याकडून काम करून घेतलं जायचं आणि त्या कैदी बायका अतिक्षीण झाल्यावर त्यांना आऊसश्वित्झला गॅस चेंबरमध्ये पाठवलं जायचं.

एकदा हाना असते त्या छावणीवर बॉम्ब हल्ले होतात. त्यामुळे शेकडो ज्यू स्त्री कैद्याचं स्थलांतर केलं जातं. त्यांच्याबरोबर अनेक जर्मन अधिकारी आणि सुपरवाईजर असतात. त्यात हानाही असते. हे दिवस कडाक्याच्या हिवाळाचे असतात. धड अन्न नाही, की गरम कपडे आणि बूट नाहीत, अशा परिस्थितीमुळे निम्म्या-शिम्म्या ज्यू कैदी स्त्रिया वाटेत मरून जातात. पश्चिम दिशेकडे कूच करत असतांना वाटेत एका अतिशय छोट्या गावात सर्वजण मुक्काम करतात. पाद्र्याच्या रिकाम्या घरात अधिकारी राहातात आणि कैद्यांना चर्चमध्ये डांबून ठेवतात.

काही जर्मन अधिकारी चर्चवर पहारा ठेवण्याचं काम करत असतात. त्यात आत्ताच्या कोर्ट केसमध्ये आरोपी असलेल्या – हाना धरून – पाचही जर्मन बायका असतात. पण एका रात्री ह्या गावावर आणि चर्चच्या टॉवरवरही बॉम्ब पडतात. प्रथम टॉवरला आणि मग सगळ्या चर्चला आग लागते. चर्चची दारं बंद असतात. त्यामुळे ज्यू कैदी स्त्रिया बाहेर जाऊ शकत नाहीत आणि सर्वजणी होरपळून मरतात. फक्त एक आई आणि तिची मुलगी वाचतात. पुढे ही मुलगी तिच्या ह्या अनुभवांवर पुस्तक लिहिते. युद्धानंतर ती न्यू यॉर्कमध्ये राहात असते. हाना आणि इतर चार अशा पाच जर्मन सुपरवाईजर बायकांवर कोर्ट केस चालू असतांना त्या दोघी ज्यू मायलेकी मुख्य साक्षीदार असतात.

ह्या पाच जर्मन सुपरवाईजर बायकांवर मुख्य दोन आरोप असतात. त्यांना दोन प्रश्न विचारले जातात. एक म्हणजे त्या आऊसश्वित्झला पाठवायच्या कैद्यांची निवड कशी करायच्या. दुसरं म्हणजे त्यांनी चर्चची दारे उघडून ज्यू कैद्यांना का वाचवलं नाही. ह्या सगळ्याचं खापर उरलेल्या चार आरोपी हानावर फोडतात. तिची थोडी खिल्लीही उडवतात. किंबहुना हानाही ते आरोप स्वतः स्वीकारते. तिला जन्मठेपेची शिक्षा होते आणि इतर चौघींना फक्त काही वर्षांची.

संदर्भ

ह्या गोष्टीला एका ऐतिहासिक कोर्ट केसचा संदर्भ आहे. मायडानेक इथल्या छळछावणीत झालेल्या अत्याचारांबद्दल काही सुपरवाईजर बायकांवर ड्यूसेल्डोर्फ इथे १९७५ ते ८१ खटला चालवला गेला होता. हेर्मीनं रायन (Hermine Ryan) म्हणून एक आरोपी असते. तिच्यात आणि हानामध्ये खूप साम्यस्थळे दाखवता येतात. पण रायनची कोर्टातली भूमिका आणि तिचं वागणं ह्यापेक्षा हानाचं वागणं अगदी वेगळ असतं. रायन म्हणते ‘माझ्याहातून गुन्हा झालाय, पण मी खुनी नाहीये.’ रायन स्वतःवरचे सर्व आरोप फेटाळते. हाना मात्र झालं ते प्रांजळपणे मांडते. आम्हाला आज्ञा द्यायला तिथे कोणी नव्हतं. त्या गावावर बॉम्ब पडल्यावर सर्व अधिकारी, सर्व वहानं एकदम नाहीशी झाली. आमचं काम होतं कैदी बायकांना डांबून ठेवणं. त्यांना पळून जाता येणार नाही ह्याची खबरदारी घेणं. ती आमची जबाबदारी होती, आमचं कर्तव्य होतं. ती भाबडेपणानी न्यायाधीशालाच विचारते की, ‘अशावेळी तुम्ही काय केलं असतं?’

शीर्षक

फोरलेझर (Vorleser) हे कादंबरीचं मूळ शीर्षक. ‘फोर’ म्हणजे पुढे किंवा समोर. ‘लेझर’ म्हणजे वाचक, वाचणारा. ‘फोरलेझर’ म्हणजे म्हणजे मोठ्यांदी वाचून दाखवणारा. ‘द रीडर’ ह्या इंग्रजी शीर्षकात हे स्पष्ट होत नाही. ‘वाचून दाखवणं’ हा धागा सबंध गोष्टीत दिसतो. हानाला प्रथम मायकेल अभिजात साहित्यातल्या गोष्टी वाचून दाखवतो. तेव्हा युद्ध संपून दहा-बारा वर्षं झालेली असतात आणि हाना ट्रॅम कंडक्टर म्हणून काम करत असते. पण त्याच्याही आधी हाना युद्धकाळात क्राकाऊच्या छळछावणीत सुपरवाईजर असताना ती काही अशक्त कैद्यांची निवड करायची. त्यांना आपल्याकडे बोलवून घ्यायची. आणि नंतर काही दिवसांनी आऊसश्वित्झला पाठवून द्यायची. त्यामुळे छावणीत एक सर्वसामान्य समज असा होता, की ती ह्या कैदी बायकांचा आणि मुलींचा गैरवापर करते. पण नंतर तिचं बिंग फुटतं. काही जणींना माहीत होतं की ती ह्या कैद्यांना चांगलं वागवायची, खाऊ पिऊ घालायची आणि पुस्तकं वाचून दाखवायला सांगायची. पुढे ती तुरुंगात असतांनाही मायकेल पुस्तकं वाचून टेप करून त्या कॅसेट तिला पाठवायचा.

कोर्टात जेव्हा असा प्रश्न विचारला जातो, की चर्चच्या प्रसंगावर रिपोर्ट कोणी लिहिला, तेव्हा इतर चार आरोपी हानाकडे बोट दाखवतात. ती प्रथम ‘मी नाही लिहिला’ असं म्हणते. पण जेव्हा तिचं हस्ताक्षर रिपोर्टशी पडताळून बघण्याचा प्रश्न येतो, तेव्हा ती म्हणते, त्याची काही जरूर नाही. तो रिपोर्ट मीच लिहिला आहे. आपल्याला लिहिता वाचता येत नाही, ही गोष्ट हाना कोर्टात सांगत नाही. मौन पळते. त्यामुळे शेवटी ती मुख्य आरोपी ठरते आणि जन्मठेपेची शिक्षा भोगते.

मायकेलच्या लक्षात येतं की तिला वाचता येत नसतं आणि ते लपवण्याचा ती आटोकाट प्रयत्न करत असते. तेव्हा त्याला पूर्वीचेही काही प्रसंग आठवतात. (हाना कोर्टात सांगते, ती १८-१९ वर्षांची असतांना सीमेन्स कंपनीत नोकरी करत असते. तिथे तिला मिळत असलेली बढती ती नाकरते. त्याच वेळी ती सैन्यात दाखल होण्यासाठी लागलेली एक नोटीस बघते आणि सैन्यात जाण्याचं ठरवते. तिथे काय प्रकारचं काम करावं लागेल ह्याची तिला कल्पना नसते. मायकेलशी संबंध असतांना जेव्हा ती एकदम नाहीशी होते, तेव्हा ती ट्रॅम कंडक्टर म्हणून नोकरी करत असते. तिला बढती मिळते, पण ती न स्वीकारता ती पळून जाते.) जिथे जिथे लिहिण्या-वाचण्याशी संबंध येईल, ते ती सतत टाळते.

पुढे आयुष्याच्या शेवटी ती तुरुंगामध्ये आपली आपण लिहायला आणि वाचायला शिकते. मायकेलनी पाठवलेल्या कॅसेट्स ऐकतांना ती तुरुंगाच्या लायब्ररीतून तेच पुस्तक आणते. कॅसेटवरून ऐकलेला प्रत्येक शब्द कसा लिहिला जातो, ते बघून लिहिण्याचा सराव करते. मायकेलला तिनी लिहिलेल्या छोट्या चिठ्ठ्या अगदी लहान मुलांनी लिहाव्या अशा असतात.

तेव्हा वाचनाबरोबर निरक्षरता हाही एक मुद्दा कादंबरीत येतो. निरक्षरतेमुळे येणारं अवलंबित्व, कनिष्ठ स्तरावर जगणं आणि स्वतःला काहीही मत आणि मान नसणं हेही मुद्दे अनुषंगानं येतात.

हाना

हाना घोड्यासारखी डौलदार आणि ताकदवान असते. एकदा मायकेलचं आणि तिचं भांडण होतं तेव्हा ती त्याला आपल्या पट्ट्यानी दोन फटकारे मारते. अशी काही वर्णनं ह्या कादंबरीत येतात. पण बाकी ठिकाणी हाना सरळ आणि चांगली वागणूक असलेली बाई दाखवली आहे. प्रेमळ, स्वच्छतेविषयी अतिशय जागरूक असलेली. ती मायकेलला खूपदा आईच्या प्रेमानं वागवते. छळछावणीतल्या कैदी मुलींनाही ती चांगलं वागवते. कोर्टामध्ये तिच्याखेरीज इतर आरोपी बायका त्यांच्यावरचा प्रत्येक आरोप नाकारतात. हानाची टर उडवतात. हाना कोर्टात जरा गोंधळली असली तरी शांत दिसते. न्यायाधीशांनी विचारलेला कुठलाही प्रश्न ती टाळत नाही.

(ती पुढे लिहायला वाचायला शिकते ह्याचा मायकेलला आनंद होतो आणि त्याला तिचा अभिमानही वाटतो. तसंच पत्रातल्या छोट्या अभिप्रायावरून ती किती लक्षपूर्वक ऐकते आणि वाचते हे दिसून येतं. त्याचबरोबर तिची आकलन क्षमता आणि संवेदनशीलताही जाणवते.)

आत्महत्या करण्यापूर्वी ती जेलर बाईंना एक पत्र लिहिते. त्यात मायकेलला ती एक काम सोपवते. तिच्या खात्यावर सात हजार मार्क असतात आणि तिच्या टेबलावरच्या एका डबीमध्ये पण थोडे पैसे असतात. हे पैसे मायकेलनी त्या चर्चमधून वाचलेल्या आणि पुस्तक लिहिणाऱ्या ज्यू बाईला द्यावेत, असं ते काम असतं. पुढे मायकेल एकदा न्यू यॉर्कमध्ये ह्या बाईंची भेट घेतो. तेव्हा त्या म्हणतात, ह्या कृतीतून तिला तिच्या पापांपासून मुक्ती मिळेल अशी तिची कल्पना आहे का? तसं असेल तर अशी मुक्ती तिला मिळू शकणार नाही आणि ती मिळावी, अशी माझी इछाही नाही. त्या बाई फक्त ती छोटी डबी ठेऊन घेतात. कारण त्यांची अशीच एक छोटी डबी लहानपणी छळछावणीत हरवलेली असते. ती मायकेलला सांगते, तुम्हीच ही रक्कम तिच्या नावानी कोणत्या तरी समाजोपयोगी काम करणाऱ्या संस्थेला द्या. तसं तो करतोही.

कादंबरीची पार्श्वभूमी

ह्या कादंबरीमध्ये जवळ जवळ एका आड एक प्रकरणात गोष्ट पुढे सरकते. इतर प्रकरणांमध्ये कथानाबरोबरच वैचारिक द्वंद्व, त्या काळातल्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी, वैचारिक धारा यांबद्दल भाष्य आहे. त्यामुळे आपल्याला त्या काळाची पार्श्वभूमी आणि आणि जर्मनीमधले युद्धानंतरचे धगधगते प्रश्न यांची जाणीव आणि माहिती होते. कथनामध्ये नाझी कोर्ट केसेस, जर्मनीचा ताजा इतिहास असे महत्वाचे संदर्भ येतात. त्यामुळेच, ही कादंबरी फार जाडजूड नसली तरी तिचा आवाका प्रचंड आहे.

ह्या कादंबरीला इतिहासाबरोबर समकालीन परिस्थीची पार्श्वभूमी असल्यामुळे तिला भरभरून प्रतिसाद मिळाला असावा. तिच्या अनेक आवृत्या निघाल्या आणि भाषांतरंही झाली.

जर्मन इतिहासाशी झुंज

ह्या कादंबरीला अनेक पदर आहेत. त्यातले दोन महत्वाचे पदर म्हणजे जर्मनीच्या इतिहासाशी दोन हात करून तो समजून घेण्याचा आणि मुख्य म्हणजे स्वीकारण्याचा प्रयत्न. हानाची केस साधारण १९६५ ते ६७ साली म्हणजे मायकेल विशीच्या सुरवातीला असतांना आणि विधी शाखेचा विद्यार्थी असतांना चालू असते. हा जर्मनीच्या इतिहासातला फार महत्वाचा आणि अस्वस्थ काळ आहे.

मायकेलची पिढी ही युद्धोत्तर पिढी आहे. मायकेलच्या वडलांची आणि हनाची पिढी ही नाझी राजवटीत जगलेली पिढी असते. ह्या दोन पिढ्यांमधला संघर्ष शिगेला पोचलेला होता असा हा काळ. विद्यापीठात शिकणारी मायकेल सारखी तरुण मुलं आपल्या वडलांच्या पिढीला जाब विचारायला लागली, तो हा काळ. प्रौढ पिढी ही (Taeter-Generation) प्रत्यक्ष नाझींच्या क्रूरकर्मात आणि पापात सहभागी झालेल्यांची किंवा ज्यांनी ही कृत्य घडू दिली, ज्यांनी विरोध केला नाही, ज्यांनी जे होतंय ते विरोध न करता सहन केलं, अशांची पिढी. ही पिढी युद्धानंतर जवळपास वीस वर्ष गप्प बसली होती. बेचिराख आणि अपमानित झालेला, आर्थिक परिस्थिती रसातळाला गेलेला जर्मनी, युद्धात झालेली मनुष्यहानी, मानसिक धक्का, अपराधाची तीव्र भावना, आपल्या राष्ट्राने केलेल्या अत्याचाराची वाटणारी लाज ह्या सगळ्यामुळे प्रौढ पिढीचं मौन. विभागलं गेलेलं  राष्ट्र, दोस्त राष्ट्रांच्या सैन्याच्या छावण्या, असंख्य लोकांचं स्थलांतर, निर्वासित लोक, नाहीश्या झालेल्या, हरवलेल्या, मारले गेलेल्या आप्तांची शोधाशोश, नातेवाईकांशी भेट, राष्ट्राची पुनर्बांधणी, ह्यात हा काळ निघून गेला. अशा अनेक कारणांमुळे प्रौढ पिढी १९४५ मध्ये युध्द संपल्यानंतर १९६५-६६ पर्यंत नाझी भूतकाळ किंवा युद्धाबद्दल कित्येक वर्ष बोलूच शकली नाही. नाझी अत्याचारांच्या भायानकतेची जाणीव सगळ्यांनाच होती. दोन पिढ्यांमध्ये असलेला एकप्रकारचा अबोला, भयाण शांतता, बोला-चालीचा अभाव, कुटुंबात तणाव. कोणालाही मोकळेपणाने एकमेकांशी बोलण्याचं धाडस नव्हतं, इच्छा नव्हती. कर्मी पिढीला अपराधीपणामुळे आणि तरुण पिढीला लाज वाटत असल्यामुळे.

आपल्या इतिहासाला पचवून ह्या सार्वजनिक अपराधी भावनेतून बाहेर कसं पडायचं? (How to overcome the problem of Collective Guilt and how to come to terms with the recent past) ह्या अतिशय महत्वाच्या प्रश्नांना राष्ट्र सामोरं जात होतं. हा सगळ्यात मोठा होता अंतर्मनात चाललेला संघर्ष.

हाना आणि मायकेलचे वडील ह्यांच्या बरोबर मायकेलच्या भोवतीचे लोक, तसंच त्याच्या मित्रांचे वडीलही ह्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात. मायकेल वडलांशी फारच विरळा बोलत असे आणि त्यांच्याशी काही बोलायचं असेल, तर त्यांच्या भेटीची वेळ ठरवून (appointment) घ्यायला लागायची. ते तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर होते आणि त्यांच्या तासांच्या वेळा सोडून ते फारसे बाहेर पडत नसत, असं त्याचं वर्णन येतं. हुशार, प्रतिष्ठित, लेखक, प्रोफेसर. त्यांना नाझी हुकूमतीत आपली नोकरी गमवावी लागली होती. ते प्रत्यक्ष क्रूरकर्म करणारे नव्हते, तरी ते घरात मोकळेपणानी बोलत नसत.  

अशा अनेक कारणांमुळे १९६७-६८ साली तरुण पिढीचा उद्रेक झाला. जर्मनीमध्ये प्रथम बर्लिनच्या विद्यार्थ्यांनी उठाव केला. त्यांना इतर संस्था, कामगार युनियन, समाज सुधारक, बुद्धीवादी, विचारवंत येऊन मिळाले. बर्लिन आणि फ्रांकफुर्ट ही दोन महत्वाची केंद्रे होती. तिथे शिकवणारे काही डाव्या विचारसरणीचे प्रोफेसर होते. ह्या काळातले प्रसिध्द तत्त्ववेत्ते आणि त्यांची विचारसरणी ‘फ्रांकफुर्ट स्कूल’ म्हणून ओळखली जाते. त्यामध्ये आदोर्नो, होर्कहायमर सारखे तत्त्ववेत्ते मोडतात. त्यामुळे फ्रांकफुर्ट युनिव्हर्सिटी चळवळीचे वैचारिक केंद्र बनले.

शिवाय १९६६ ते ६९ ह्या काळात जर्मनीमधले दोन प्रमुख आणि सगळ्यात मोठ्या पक्षांचं एकत्र सरकार सत्तेवर होतं. विरोधी पक्ष अतिशय कमकुवत होता. त्यामुळे ‘संसदबाह्य विरोधी संघटने’ची (Outer Parlamentary Opposition ची)उभारणी झाली. घरी पालक, विशेषतः वडील, आणि राष्ट्रपातळीवर सरकार हे अधिकारशाही वृत्तीचे (authoritarian) आहेत, म्हणून त्यांच्या विरुध्द आवाज उठवणं गरजेचं आहे, असं तरुण पिढीचं म्हणणं होतं. त्यामुळे ही चळवळ अधिकारशाही वृत्तीच्या विरोधातली चळवळ (anti- authoritarian movement) म्हणूनही ओळखली जाते.

थोडक्यात म्हणजे विद्यार्थी पारंपारिक संसदीय निर्णय पद्धती नाकारत होते. सामाजिक अन्याय आणि संपत्तीची असमान विभागणी ह्यांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यांना शासनात आणि प्रशासनात बदल घडवून आणायचा होता. पण तेव्हा त्यांनी विरोध करूनही आणीबाणी आणली गेली.

स्वातंत्र्य आणि न्याय हे अर्थातच सगळ्यात महत्वाचे मुद्दे होते. अधिक प्रभावी लोकतंत्र, जर्मनीच्या नाझी भूतकाळाची हाताळणी, अभ्यासक्रम बदलणे, व्हिएतनाम युध्द थांबवणे, तिसऱ्या जगातील लोकांची परिस्थिती सुधारणे, उजव्या ‘श्प्रींगर’ नावाच्या जर्मन प्रेसचा प्रभाव कमी होईल असे प्रयत्न करणे, अभिव्यक्ती आणि प्रेस-प्रकाशन स्वातंत्र्य, आणि येऊ घातलेली आणीबाणी थोपवणे, इत्यादी त्यांच्या कार्यक्रमातली प्रमुख कलमं होती.

आणीबाणी आणूनही ह्या चळवळीचे काही दूरगामी परिणाम झाले. ही विद्यार्थी चळवळ १९६८ च्या सुमारास फ्रान्स – अमेरिकेपासून अनेक देशात पसरली. आपल्याकडेही युक्रांद सारख्या संघटना ह्या काळात प्रभावित आणि कार्यरत होत्या. स्त्रीमुक्तीच्या चळवळीला प्रेरणा मिळाली.

पण तरीही ह्या चळवळीच्या काही दृश्य परिणामांची नोंद घ्यावी लागेल. ह्या चालवळीत सक्रीय सहभागी झालेल्या महिलांच्या हे लक्षात आलं की पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये त्या दडपल्या जातायत. त्यांच्यामध्ये ही परिस्थिती बदलायला पाहिजे अशी उर्मी जागी झाली. ह्या विद्यार्थ्यांमुळे मुलांना वाढवण्याच्या, त्यांच्या संगोपनाच्या आणि शिक्षणाच्या अधिक लिबरल पद्धती विकसित झाल्या. कलेच्या क्षेत्रावर त्याचा प्रभाव पडला.

१९७० च्या दशकात सुरवातीला फादर बायोग्राफीज असा एक जाँन्र तयार झाला असं म्हटलं तरी चालेल. काही तरुण लेखकांनी वडिलांना प्रश्न विचारायला सुरवात केली आणि त्या विषयी लिहिलं. त्याचं मौन मोडण्याचा प्रयत्न केला. व्यक्त व्हायला भाग पडलं.

आजही जर्मन लोकांना त्याचा इतिहास पछाडत असतो. तरुण पिढी नाझी राजवट आणि त्याचे भयंकर परिणाम विसरू नये म्हणून आजही प्रयत्न केले जातात. युद्धात वाचलेल्या लोकांना बोलवून त्याचा सन्मान केला जातो. नाझी काळातल्या लोकांवर अजूनही कोर्ट केसेस होतात. २४ जुलै २०२० ला एका ९३ वर्षाच्या माणसाला काही शिक्षा झाल्याची बातमी होती. तो युद्धाच्या वेळी १७-१८ वर्षांचा होता. ५ हजार युद्ध कैदी मारल्याचा त्याच्यावर आरोप होता.

“द रीडर”

“द रीडर” हया कादंबरीला अशी पार्श्वभूमी आहे. त्यामुळेच ह्या कादंबरीचा आवाका प्रचंड वाढतो. शिवाय कादंबरीचा साचा आणि शैली अतिशय सरळ, साधी सोपी, आहे. ही छोटी कादंबरी आहे. त्यातल्या उत्कृष्ट आणि सविस्तर वर्णनांमुळे चित्र डोळ्यासमोर उभी राहतात. लेखक किंवा निवदाक तिथे अदृश्य रहातो. ही कादंबरी त्रयस्थाच्या भूमिकेतून लिहिली आहे.

१९९० च्या दशकाच्या मध्याला, जेव्हा ही कादंबरी लिहिली गेली, तेव्हा युद्ध संपून पंचेचाळीस ते पन्नास वर्षं झालेली होती. तेव्हा हानाला आपली सगळी पुंजी युद्धात वाचलेल्या बाईंना द्यावीशी वाटली. मायकेलने तिची इच्छा पूर्ण करून तडजोडीची तयारी दाखवली. लेखक स्वत: मायकेलच्याच वयाचा आहे. त्याने दोन पावलं पुढे टाकून संबंध सुधारण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मुळात कादंबरीचा स्वर शांत आहे; भावना चेतवणारा नाही. अस्वस्थ करणाऱ्या घटनाही समतोल राखून मांडल्या आहेत. जर्मनीच्या इतिहासातले अनेक महत्वाचे विषय विश्वासार्ह पद्धतीने हाताळले आहेत. ह्या गोष्टींमुळे ही कादंबरी लोकप्रिय झाली असावी.

 

 

 

Comments

Popular posts from this blog

Kafka : A modernist Author

Translating Literatures – Translating Cultures

Räumlichkeit und Mobilität bei Kafka im Lichte der Raumtheorien